मुंबईत डिसेंबरपर्यंत येणार स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल

मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने बंद दरवाजाच्या नॉन एसी लोकल आणण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत या लोकल सेवेत येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. यानंतर टप्प्याटप्याने सर्व लोकलमध्ये बंद दरवाजाची सुविधा येईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे. रेल्वेत होणाऱ्या दुर्घटनांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. आमचे प्राथमिक उद्दिष्ट हे प्रवाशांची सुरक्षा आहे. त्यामुळेच भविष्यातील सर्व गाड्या स्वयंचलित दरवाजाच्या असतील असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.

घणसोली येथे बुलेट ट्रेनच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबईत पहिली स्वयंचलित लोकल दरवाजांची नॉन-एसी डिसेंबरपर्यंत येणार आहे. भविष्यात मुंबईतील सर्व लोकल टप्प्याटप्प्याने स्वयंचलित दरवाजाच्या असतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

जून 2025 मध्ये मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान दोन लोकल ट्रेन जवळून जात असताना झालेल्या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलावीत अशी मागणी सुरु झाली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद दरवाजाच्या लोकल आणल्या जातील असं जाहीर केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका करत अशा लोकलने प्रवास करताना प्रवासी गुदमरतील अशी टीका केली होती. मात्र केंद्रीय मंत्रालयाने बंद दरवाजाच्या लोकल सेवेत आणण्याचा निर्णय घेतला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐन गर्दीच्या वेळी लोकलमधून 4 हजाराहून अधिक प्रवास करतात. पण तिची क्षमता फक्त अडीच ते तीन हजार प्रवासी असते. अशा परिस्थितीत, बंद दरवाज्यांची लोकल आल्यास अपघात रोखले जाऊ शकतात.

मुंबईत 12 डब्यांच्या लोकल धावतात. त्यापैकी काही लोकल 15 डब्यांच्या असतात. काही प्लॅटफॉर्म मोठे नसल्याने तिथे जास्त डब्यांच्या गाड्या थांबवण्यात अडचण येते. दरम्यान नव्या निविदेत 15 डब्यांच्या गाड्यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. तसंच भविष्यात 18 डब्यांच्या लोकलवर भर देण्याची तरतूद आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने अलीकडेच 2856 वंदे मेट्रो कोच खरेदीसाठी ई-निविदा जारी केली आहे. या कोचची देखभालदेखील दीर्घकालीन कराराखाली केली जाईल. या कोचमध्ये मेट्रोसारखी वैशिष्ट्ये असतील. बंद दरवाजे, सुधारित वायुविजन, आरामदायी आसन व्यवस्था आणि सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान ही वैशिष्ट्ये आहेत.