इस्लामपूरात अयोध्येच्या मंगल अक्षतांचे घरोघरी पूजन!

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामलल्ला जन्मस्थळी २२ जानेवारीस विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्येतून मंगल अक्षताची पूजाविधी करून इस्लामपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. या अक्षतांचे पुरोहित भास्कर उर्फ शाम दंडगे या जोडप्यांने विधिवत पूजन करून घरी राम स्तोत्रचे पठण केले.


२२ जानेवारीस होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्यदिव्य नियोजन करण्याचे तसेच घरोघरी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करा. गल्लोगल्ली – दारोदारी प्रत्येक मठ- मंदिरात या उत्सवाचे फलक, एलसीडी प्रोजेक्टर तसेच मोठ्या प्रमाणात दिवाळीसारखा हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले आहे. येथील किसाननगर परिसरात या मंगल अक्षतांचे घरोघरी वाटप करण्यात आले.

पुरोहित भास्कर उर्फ शाम दंडगे यांनी पुढाकार घेत फक्त अक्षता वाटप न करता त्यांचे विधिवत पूजन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. अक्षतासोबतच घरोघरी श्रीरामलल्लांची प्रतिमा देऊन कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले. या पूजन अक्षता पूजन वेळी अपर्णा पाटणकर, मृणाल घोरपडे, भाग्यश्री वाळवेकर, शिल्पा चिवटे, नारायण पेठकर, आशिष पाटणकर, सोनाली दंडगे, भावेश पटेल, ज्योती शिंदे, वल्लभ दंडगे आदी उपस्थित होते.