महिलांनी शासकीय, जिल्हा बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा

 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा उद्योग केंद्र सांगलीच्यावतीने आष्टा येथे महिला स्वयंरोजगार मेळावा झाला. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणेसाठी शासकीय योजना व बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन छोटे मोठे उद्योग उभा करून सक्षम व्हावे. यासाठी जिल्हा बँक सर्व ते सहकार्य करेल, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी केले.

बँकेचे अधिकारी साजीद मुलाणी यांनी महिलांनी व्यवसायास प्राधान्य द्यावे यासाठी शिलाई मशीन, डाल मिल, ऑईल मिल, आटा चक्की, मसाले पदार्थ निर्मिती, बेकरी पदार्थ, दुग्ध पदार्थ, कुक्कुटपालन तसेच लहान व मोठ्या व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. यासाठी योजने अंतर्गत २५ टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. तसेच प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा. उद्योग निरीक्षक अश्विनी चव्हाण यांनी जिल्हा उद्योग केंद्र कडून दिल्या जाणाऱ्या योजनेबाबत महिलांना बँकेमार्फत कर्ज मिळाल्यानंतर सदर योजने अंतर्गत शहरी भागात २५ टक्के ग्रामीण भागात ३५ टक्के अनुदान मिळणार आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन केले. पं. स. माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या सुविधा व जिल्हा उद्योग केंद्र मार्फत दिला जाणाऱ्या अनुदानामार्फत महिला बचत गट व वैयक्तीक उद्योग उभारावीत, असे आवाहन केले.

यावेळी माजी नगराध्यक्षा स्नेहा माळी, झिनत अत्तार, संगीता सूर्यवंशी, रागिनी सावंत, मनीषा जाधव, श्रद्धा लांडे, ज्योती चौगुले, सारिका मदने, वैशाली डफळे, वर्षा देसावळे, सारिका शिंदे, वैशाली पाटील शबाना मुल्ला, स्नेहल शिंदे मिरजकर, सोनाली कटारे, वरदराज शिंदे, संतोष लकांबरे उपस्थित होते.