हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल- बिरदेवाच्या यात्रेनिमित भाविकांची मोठी गर्दी होत असते. यात्रा सुरळीत पार पडावी याकरिता सदैव लक्ष केंद्रित करुन नियोजनात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल-बिरदेवाची ८ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या यात्रेसंदर्भात महसूल विभागातर्फे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पट्टणकोडोली गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण झाल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही. खराब झालेले रस्ते ३० तारखेपर्यंत पूर्ण करुन घेणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी सांगितले. तसेच आठवड्याभरात उर्वरित रस्त्यांची डागडुजी पूर्ण करणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश ठाकुर यांनी यात्रा परिसरातील सर्व रस्ते व इतर सोयीसुविधा पूर्ण केल्या असून उर्वरित कामेही आठवड्याभरात पूर्ण करणार असल्याचे सांगितले. इचलकरंजी एस.टी. आगार प्रमुख शिल्पा थोरात यांनी पट्टणकोडोली यात्रेसाठी जादा बसगाड्यांची सोय केल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांनी तालुकास्तरावरुन जादा कर्मचारीमागविण्याची व्यवस्था केली आहे. यात्रा परिसरात अनेक ठिकाणी वैद्यकीय पथके लावणार असल्याचे सांगून ४ अॅम्ब्युलन्सची सोय केली असल्याचे सांगितले. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडीत होणार नसल्याचे सांगत ज्या-ज्या ठिकाणी लाईटची सोय करावी लागणार आहे त्या ठिकाणी पूर्ण करुन घेणार व जादा कर्मचाऱ्यांची कुमक पथके उभारणार असल्याचे सांगितले. गावात फिरते स्वच्छतागृह व अग्निशामक गाड्यांची व्यवस्था गटविकास अधिकाऱ्यांनी करावी. यात्रा काळात पिण्याचे पाणी किती लागेल व ते शुद्धीकरणासाठीची कोणती व्यवस्था केली आहे याबाबतची लेखी माहिती ग्रामपंचायतीने द्यावी. गावभागातील व यात्रा परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी व बॅकअपबाबत काळजी घ्या, अशा सूचनाही प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिल्या.
पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय भांगर यांनी सुमारे ४०० हून अधिक पोलीसांची कुमक मागविणार असून १२ ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीतर्फे रस्त्याकडेला तणनाशकांची फवारणी, दिवाबत्ती सुस्थितीत करण्याचे काम, फॉगिंग मशीनद्वारे संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करणे ही कामे चालू असल्याची माहिती दिली. देवस्थान कमिटीच्या पंचांनी सांगितले की, कर्नाटक व इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना पोलीसांनी कोणत्याही प्रकारचा त्रास देवू नये, यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री महादेव जानकर यांनीही भेट देऊन प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या. या बैठकीस अप्पर तहसीलदार महेश खिलारी, मंडल अधिकारी जानकी मिराशी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी कटारे, सरपंच नम्रता माळी, प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील, तलाठी रविशंकर राजगीरवाड, ग्रामविकास अधिकारी तुकाराम हणमंते, पोलीस पाटील मोहनकुमार वर्धन, महसूल सेवक साताप्पा रामाण्णा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी पाटील, डॉ. वैष्णवी घाटगे, एस. आर. माने, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पोवार, रविंद्र आडके, मधुकर पवार, माजी उपसरपंच धुळगोंडा डावरे, राणोजी पुजारी, रायगोंडा डावरे, सिद्राम भाणसे, सुनिल अवघडे यांच्यासह देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.लक्ष्मण पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर अभिजीत पाटील यांनी आभार मानले.
