सांगली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला गजाआड केले असून त्याने चोरलेली सुमारे १६ लाख १० हजार रुपये किमतीची २२ वाहने जप्त केली आहेत. फिरोज नबीलाल मुल्ला (वय ३१, रा. जुळेवाडी, ता. तासगाव) असे या चोरट्याचे नाव आहे.
कुपवाड एमआयडीसी, कासेगाव पोलिस ठाणे, महात्मा गांधी चौक, मिरज, मिरज शहर, इस्लामपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, शाहुपूरी, गांधीनगर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, जेलरोड, फौजदार चावडी, सातारा जिल्ह्यातील कराड, कर्नाटकातील विजयपूर येथील गोलघुमट पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाहनांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडे आणखी दोन दुचाकी सापडल्या असून त्याबाबत कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. चोरट्याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
