शिरगाव-वाळवा पुलाचे लोकार्पण संपन्न

वाळवा तालुक्यातील शिरगाव – वाळवा या पुलाचा लोकार्पण सोहळा आ. जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील, नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवराज देशमुख, नेताजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

स्वागत व प्रास्ताविक नेताजी पाटील यांनी केले. यावेळी बोलताना दिलीप पाटील म्हणाले,आ.जयंत पाटील यांनी वाळवा व शिरगाव गावांसाठी मोठा निधी दिला. तत्कालीन मंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी मदत केली. व हा पूल पूर्ण झाला पण विरोधक पुल आम्ही केला आहे असे बोलत आहेत परंतु या पुलासाठी आमदार जयंत पाटील यांनी मोठी मदत केली ही वस्तुस्थिती आहे. शिरगाव गावच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आज सुटला आहे. आमदार जयंत पाटील बोलताना म्हणाले, कृष्णा नदीवरील शिरगाव व वाळवा गावांना जोडणारा हा पुल कदाचीत सर्वात उंच व लांब पल्ल्याचा कृष्णा नदीवरील एकमेव पुल असावा. पूरपरिस्थितीच्या काळात शिरगाव गावच्या नागरीकांना खूप मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत होते. पण हा प्रश्न सुटला याचे समाधान आहे. शिरगाव गावातील लोक अतिशय हुशार आहेत या पुलासाठी कोणी प्रयत्न केले हे कायम लक्षात ठेवतील याचा मला विश्वास आहे.

यावेळी संजय पाटील, बजरंग आंबी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी वाळवा गावचे उपसरपंच, सदस्य शिरगाव गावचे सरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले.