काशिलिंग बिरोबाच्या नावानं चांगभलं… अंबाबाईच्या नावानं चांगभलं.. रेणुका देवीच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात येथील श्री काशिलिंग बिरोबा देवाचा दसरा महोत्सव शिलंगण भंडाऱ्याच्या प्रचंड उधळणीत उत्साहात साजरा झाला. दसरा महोत्सवासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. दसरा मैदानावरती आपट्याची पाने व भंडाऱ्याची प्रचंड उधळण करीत हा उत्सव साजरा झाला.
पहाटे काशिलिंग बिरोबा मंदिरात जलाभिषेक, दुग्धभिषेक, महाआरती झाली. दुपारी मंदिरात ढोल वादन, धनगरी ओवी, गज नृत्य असे कार्यक्रम झाले. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी महिला नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी साडेसहा वाजता शिलंगण मैदानावर ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीची पालखी वाद्याच्या गजरात दाखल झाली. तसेच यल्लमा तथा रेणुका मातेची पालखी या ठिकाणी आली. ढोलाच्या दणदणाटात श्री काशिलिंग बिरोबा देवाची पालखी मंदिरातून बाहेर पडली. प्रचंड भंडाराची उधळण करीत ती दसरा शिलंगण मैदानावर दाखल झाली. यावेळी नागरिक व महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तिन्ही पालख्या एकत्रित येत या ठिकाणी बहीण-भावाची भेट होत पालख्यांची भेटा भेट झाली. सिमोल्लंघन कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक निघाली. येथील जुगाई मंदिरात हेडमी यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तिन्ही पालख्या आपापल्या मंदिरात गेल्या.
