इचलकरंजी, महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी रेशन धान्य दुकानदार महासंघ (कोल्हापूर) यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सणासुदीसाठी गोरगरीबांचे सण गोड व्हावेत म्हणून आनंदाचा शिधा दिला होता. तो बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा. त्याचबरोबर जून ते सप्टेंबर पर्यंतचे मोफत धान्य वाटपाचे मार्जीन मनी लवकर मिळावे, इ-पॉझ मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे धान्यापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, रेशन दुकानदारांना लॉगिनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, रेशन दुकानात तेल, डाळ, साखर इ. जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी सरकारने उपलब्ध करून द्याव्यात आदि मागण्या करण्यात आल्या. निवेदन स्विकारून मोहिनी चव्हाण यांनी, शासनाच्या वित्तीय विभागाशी संपर्क साधून मार्जीन मनी लवकरात लवकर देण्याची मागणी केली. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, राज्य सदस्य दिपक शिराळे, गजानन हवालदार, अशोक सोलापूरे, धीरज भंडारे, आनंदालादे, सरिता हरूगले, तानाजी जाधव, साताप्पा कांबळे, आदित्य दावणे, प्रमोद हराळे, पंकज सोरटे आदि उपस्थित होते.
