सांगोला शहरातील बचत गटाची पूरग्रस्तांना मदत

सांगोला , मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी सांगोला नगरपरिषद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वप्रेरणेने ४५ हजार रुपये जमा करीत सदरची रक्कम पूरग्रस्तांना पोचविण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्याकडे सुपूर्द केली.

सांगोला शहरातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे काम केले असून सदर महिला बचत गट सक्षमपणे चालविण्याचे काम या महिला करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात पूरपरिस्थीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत बचत गटाच्या महिलांनी ४५ हजाराची मदत जमा केली होती.

सदर मदतीचा धनादेश शहरातील बचत गटाच्या प्रतिनिधी म्हणून कर्तव्य शहरस्तर संघाच्या अध्यक्षा सुनंदा घोंगडे, सचिव मनिषा हुंडेकरी, सदस्य ज्योत्स्रा बनसोडे, शकुंतला खडतरे व स्वप्नाली धोकटे यांच्या हस्ते मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे, सहा प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, विरप्पा हाके, शरद थोरात, जयश्री खडतरे समूह संसाधन व्यक्ती सविता लोखंडे, कोमल चांडोले, सारिका लोखंडे इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.