महापालिकेवर सत्ता व महापौर महाविकास आघाडीचाच

इचलकरंजी,  इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नासह मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यात खासदार आणि आमदार दोघेही अपयशी ठरले आहेत. महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्याकडे बोलण्यासारखा मुद्दाच राहिलेला नाही. त्यामुळेच आपल्याच मित्रपक्षांना कमकुवत करुन भाजपात प्रवेश करुन घेण्याचा केविलवाणा प्रकार सुरु आहे. पण, जनता खुळी नसून सत्ताधारी मंडळींबद्दल प्रचंड नाराजी असलेल्या जनतेने इचलकरंजीचा पहिला महापौर महाविकास आघाडीचाच करायचा हे निश्चित केले आहे, असा विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला गेला.

 इचलकरंजी शहरातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या  सत्ताधारी मंडळींबरोबरच शरदचंद्र पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेशाचा सोहळा म्हणजे आपल्याच मित्रपक्षांना संपवण्याचा डाव भाजपने आखला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केला. हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी बघत असून योग्यवेळी आपली प्रतिक्रीया व्यक्त करेल आणि महाविकास आघाडीचा महापौर होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांनी व्यक्त केला. मॅचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी सत्ताधारी मंडळींवर शाब्दिक प्रहार करताना जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर आमदार आणि खासदार यांनी उत्तर द्यावे. आमदार आवाडे यांनी शहरात कुपनलिकांची खुदाई करुन जनतेची दिशाभूल न करता सुळकुड पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी मोर्चा काढावा, त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सहभागी होऊ असे आवाहनही त्यांनी दिले. तर प्रकाश मोरबाळे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नावर महानगरपालिका निवडणुक लढली जाईल, असे सांगितले. यावेळी संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, मलकारी लवटे, सदा मलाबादे, अमरजित जाधव, प्रमोद खुडे, बाबासो कोतवाल, रणजित जाधव, वसंत कोरवी यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.