अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा रब्बी पेरणीवर परिणाम

राज्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळे खरिपातील हाता तोंडाला आलेली पिके वाया गेली . सध्या देखील शेतशिवारात साठलेल्या व पाझरच्या पाण्यामुळे रब्बी पिकासाठी वापसा नाही . त्यामुळे हरभरा , करडई व ज्वारी पेरण्या खोळंबल्या . यंदा मे महिन्यापासूनच राज्यात सर्वत्र पावसाळा सुरुवात झाली. ऐन उन्हाळ्यात देखील चालू वर्षी चांगला पाऊस पडला होता. तर परतीच्या कालावधीत अनेक ठिकाणी ढग फुटी झाली. सांगोला तालुक्यातील देखील अनेक भागात पावसाने झोडपले तर मोठ मोठ्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मका , सूर्यफूल , तूर या खरीप पिकांबरोबरच बागायती क्षेत्रातील ऊस , केळी , सीताफळ , डाळिंब , द्राक्षे याशिवाय मका , सूर्यफूल , तूर अशी हाता तोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वास्तवीक पोळा सण झाल्यांनतर सांगोला , मंगळवेढा या भागात रब्बी हंगामातील हरभरा , करडई , ज्वारी यासारखी रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु आजपावेतो रानातील पाणीच हटले नसल्या कारणाने रब्बी पिकावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या भागातील शेतकरी पोळा सण झाल्या झाल्या रब्बी पेरणीच्या तयारीला लागलेला असतो . परंतु दीपावलीच्या सण तोंडावर आला तरी आणखी रानाला वापसा आला नसल्या कारणाने यंदा ज्वारीचे पीक घेता येईल कि नाही अशी शंका निर्माण झाली आहे .