आटपाडी, तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, आरोग्य केंद्रे, शाळा दुरुस्ती, सभागृह , बंदिस्त गटारे अशा अनेक मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती समाजकल्याण समितीचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिली.
या मंजूर निधीतून झरे येथील आरोग्य उपकेंद्राला ९० लाख रुपये मिळाले असून , आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी हे उपकेंद्र अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात येणार आहे. आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती , जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून अनेक गावांतील रस्ते तयार करण्यासाठी निधी मिळाला आहे.
रानमळा रस्त्यासाठी सहा लाख , आंबेवाडी -शिवाचा मळा रस्त्यासाठी पाच लाख , शेरेवाडी रस्त्यासाठी सहा लाख , करगणी – वराडखडी घाणंद-खरसुंडी , धावडवाडी तसेच झरे ते काळचौंडी या रस्त्यांसाठी एकूण दहा लाख रूपये मंजूर झाले आहेत. तसेच बनपुरी शाळा क्र. २ साठी १४ लाख, करगणी उपकेंद्रासाठी ११ लाख, निंबवडे शाळेसाठी ३१ लाख, तर खरसुंडी आरोग्य केंद्रासाठी १५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील पडळकरवाडी,कुरुंदवाडी , घरनिकी, गळवेवाडी , घाणंद, मानेवाडी, पिंपरी बुद्रुक, दडसवाडी, उंबरगाव, जांभुळणी आणि पडळकरवाडी या गावांना एकत्रित २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक अंगणवाड्यांना साहित्यासाठी आठ लाख रूपये मिळाले आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर हे जातचे प्रतिनिधी असले तरी त्यांनी आटपाडी तालुका हे आपले माहेरघर असल्याचे सांगत, आटपाडी तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. नागरिकांच्या अडचणी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे स्पष्ट केले.
आमदार पडळकर यांच्या प्रयत्नांमुळे आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवा वेग मिळत असून, आरोग्य, शिक्षण, रस्ते व सामाजिक सुविधा या सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदल घडून येत असल्याचे ब्रम्हानंद पडळकर यांनी सांगितले.
