कार्तिकी शुध्द एकादशी सोहळा ता. २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, या वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व मंदिर समितीने केलेल्या सोयी- सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भक्तीसागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये शौचालय, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था याबाबत माहिती घेतली त्याचबरोबर मंदिर समितीकडून पत्रा शेड, दर्शन रांगेत करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दीपक धोत्रे, लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पंढरीत वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी – सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
