इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर  कडवे आव्हान

विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा विजय झाला. मात्र, हा विजय त्यांना धड साजराही करता आला नाही, आणि राज्यभर मिरवताही आला नाही.महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली. यात हा विजय दुर्लक्षित ठरला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता आमदार पाटील यांना पुन्हा नव्याने राजकीय मांडणी केली तरच जिल्ह्यात खचलेला नेतृत्वाचा शिरपेच डोईवर येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांचे वाढलेले बळ भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोलाचे भांडवल तर ठरणार आहेच, पण आमदार पाटील यांना आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद अबाधित ठेवण्यासाठी अधिक जागृत राहावे लागणार असे दिसते.