रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रविवारी झालेल्या अपघातात रांगोळी येथील सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासो बाळासो पाटील (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवसा दिवशीच अपघाती निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
दादासो पाटील हे कामानिमित्त हुपरीला गेले होते. काम उरकून सायंकाळी 5 च्या सुमारास परत येत असताना इचलकरंजी-हुपरी मार्गावर रेंदाळजवळ गावाबाहेरील वळणावर मोटारसायकलवरून येत असताना ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूच्या ट्रॉलीच्या चाकाखाली पडले. चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दादासो पाटील यांचा वाढदिवस असल्याने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्या पोस्ट फिरत होत्या. सकाळी सेवा संस्थेत समन्वय समितीची बैठक होती. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका काढण्यासाठी पुस्तके देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि सायंकाळी 5 च्या सुमारास अपघाती निधनाची बातमी समजताच गाव सुन्न झाले. सकाळी सोशल मीडियावर वाढदिवस शुभेच्छा देणार्या पोस्ट अन् सायंकाळी श्रद्धांजलीची पोस्ट या घटनेने गाव हळहळले.
