इचलकरंजी : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

यड्राव ता. शिरोळ येथे यड्राव-कोंडीग्रे मार्गावरील वळणावर सिमेंटच्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार चंद्रकांत सुरेंद्र किणींगे (वय ५५, रा. बुबनाळ, ता. शिरोळ) हे जागीच ठार झाले. या अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले आहे. या अपघाताची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
चंद्रकांत किणिंगे शुक्रवारी सायंकाळी पार्वती औद्योगिक वसाहत कार्यालयातील काम झाल्यावर दुचाकी (क्र. एम.एच. ०९ इ. इ. ६४३८) वरुन घरी निघाले होते. बेघर वसाहत रस्त्यावरील वळणावर सिमेंटच्या ट्रक (क्र. के.ए. ४८ ए १४३५) ने किणींगे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, किणींगे यांचे हेल्मेट फुटून ते जागीच ठार झाले. दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. घटनास्थळी किणींगे यांचे नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. किणिंगे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून असा परीवार आहे.