बारावीच्या पहिल्या पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे किती कारवाई? आकडेवारी समोर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा गाजावाजा केला आहे. बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला या अभियानाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. राज्यात एकूण ४२ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपीच्या प्रकाराने शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या गांभीर्याला हरताळ फासण्यात आला. भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रावर विद्यार्थी कोणत्याही भीतीशिवाय एकमेकांच्या उत्तरपत्रिकांमधून उत्तरे उतरवून काढत होते. विशेष म्हणजे, ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धाक दाखवून पारदर्शकतेचा दावा केला जातो, त्याच कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. विद्यार्थी एकमेकांशी बोलताना, पेपरची अदलाबदल करताना आणि पर्यवेक्षकांच्या उपस्थितीतच कॉपी करताना स्पष्ट दिसत आहेत.

फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. केवळ विद्यार्थ्यांवर कारवाई न करता, या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या यंत्रणेवरच त्यांनी प्रहार केला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत केंद्रसंचालकासह तब्बल १९ पर्यवेक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील जुन्या सर्व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या नवीन क्लीन स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ विभागीय चौकशीच नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचालीही सुरू आहेत.

अमरावती अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानी
राज्यातील कॉपी बहाद्दरांची आकडेवारी पाहता शिक्षण विभागात चिंतेचे वातावरण आहे. अमरावती विभागात सर्वाधिक २२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. ग्रामीण भागात कॉपी पुरवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होते. पुणे विभागात १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच इतर विभाग उर्वरित १० प्रकरणे राज्याच्या इतर भागांत विखुरलेली आहेत.

पालक आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये संताप
एकीकडे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कडक शिस्तीचे स्वागत करत आहे. तर दुसरीकडे जैतापूरसारख्या ठिकाणी होणाऱ्या सामूहिक कॉपीमुळे गुणवत्तेवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. केंद्रावर सीसीटीव्ही असूनही जर पर्यवेक्षक गप्प बसत असतील, तर हे अभियान केवळ कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल विचारत आहेत.

जैतापूरची घटना ही इतर केंद्रांसाठी इशारा आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही आणि फिरते पथक प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असेल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.