७ वाजता टीव्ही बंद; सांगोला जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावानं घातला नवा आदर्श, ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव मंजूर!

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम लक्षात घेऊन सांगोला तालुक्यातील जवळा गावाने एक धाडसी आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे.

येत्या २५ फेब्रुवारीपासून दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत गावातील सर्व मोबाईल फोन, टीव्ही आणि अन्य डिजिटल स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने जाहीर केला आहे.

ॲड. यशराजे साळुंखे-पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला असून सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकमताने तो मंजूर केला आहे. सध्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगट मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून अभ्यासाऐवजी सोशल मीडिया, व्हिडिओ गेम आणि मनोरंजनाकडे ओढा वाढत आहे. अनेक विद्यार्थी दिवसातून पाच ते सात तास स्क्रीनसमोर घालवत असल्याने त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यास, आरोग्य आणि वर्तणुकीवर होत आहे.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोपेचे चक्र बिघडणे, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा वाढणे अशा समस्या वाढताना दिसत आहेत. डोळ्यांचे विकार, मान-पाठदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. या दोन तासांच्या डिजिटल बंदमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल, कुटुंबीयांसोबत संवाद वाढेल आणि वेळेत झोपण्याची सवय लागेल, असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. रात्रीचे जेवण एकत्र घेणे, वाचन, प्रार्थना किंवा कुटुंबीयांशी चर्चा यांसारख्या सकारात्मक उपक्रमांना चालना मिळेल. तसेच लहान मुलांच्या डिजिटल व्यसनाला आळा बसेल, यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

दररोज सायंकाळी सात वाजता गावात एक गजर वाजवला जाणार आहे. त्यावेळी सर्वांना आपला मोबाईल व टीव्ही बंद करण्यासाठी इशारा दिला जाणार आहे. रात्री नऊ वाजता पुन्हा एकदा गजर वाजल्यावर आपली डिजिटल उपकरणे सुरू करण्यास हरकत नाही, अशा स्वरूपाचे आम्ही नियोजन केले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या भवितव्यासाठी हा आदर्शवत उपक्रम राबवणार आहोत.

  • सज्जन मागाडे, सरपंच, जवळा, ता. सांगोला

जवळा गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या युगात मोबाईल व टीव्हीच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यापासून थोडासा दुरावा घेण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.