आजकाल पाणीप्रश्न खूपच गंभीर आहे. तशातच हुपरी येथील रेंदाळ गावासाठी प्रस्तावित जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेला ३४ कोटींचा डीपीआर रद्द करून केवळ ५ कोटींच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. रेंदाळ गावची लोकसंख्या विचारात न घेता प्रस्तावित निधीला ८५ टक्के कात्री लावून केवळ १५ टक्के निधी मंजूर झाला याच्यापाठीमागे कारण काय असा संतप्त सवाल लोकनियुक्त सरपंच सौ. सुप्रिया पाटील-इंगळे यांनी उपस्थित करुन जोपर्यंत प्रस्तावित निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत १६ जानेवारीपासून ग्रामपंचायत आवारात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. रेंदाळ गावची लोकसंख्या व गरज लक्षात न घेता नवीन योजना केवळ शासन दरबारी दाखवण्यापुरती मंजूर केली आहे. भविष्यातील २७ वर्षे पाणीटंचाई होणार नाही. याची काळजी घेण्याचे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. इतर गावात कमी लोकसंख्या असून सुद्धा भरघोस निधींची तरतूद केली आहे. मग रेंदाळ गावाला याचा लाभ का नाही.
ग्रामपंचायत रेंदाळ गावासाठी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून ३४ कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर झाला मात्र शासनदरबारी याला कात्री लावून केवळ १५ टक्केचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यातून योग्य पाणी पुरवठा वितरण होऊ शकत नाही. गावाची लोकसंख्या विचारात घेतली नाही आणि नावाला रेंदाळ गावाच्या योजना माथी मारुन अधिकारी हात झटकत आहेत. जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा गट
विकास अधिकारी हातकणंगले, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोल्हापूर यांना याबाबत संपूर्ण माहिती देत या चुकीच्या डीपीआर विरोधात चुकीची दुरुस्ती करून पूर्वीप्रमाणे ३४ कोटी रुपयांची प्रस्तावित जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करावी अन्यथा १६ जानेवारीपासून ग्रामपंचायत आवारात बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया पाटील-इंगळे यांनी दिली.
