सध्या शक्तिपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच गाजावाजा करत आहे. या महामार्गाला काही भागात विरोध देखील केला जात आहे. तर काही भागात याला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागाचा याला विरोध दर्शविला आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा नेणार, याचे नोटिफिकेशन काढा अशी मागणी करत शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेतकरी वाचवा, देश वाचवा, जय जवान, जय किसान, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड व आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भुदरगड मतदारसंघात काही एजंट हे महामार्ग पाहिजे असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे केली. यावर आबिटकर यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला आहे, त्यामुळे महामार्ग करा, असा चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे शेतकऱ्यांना सांगितले.