दिघंची पेट्रोल पंपाच्या गैरव्यवहाराची चौकशी करा

आटपाडी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती , उपसभापती , सत्ताधारी संचालक आणि सचिवांनी कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी दिघंची पेट्रोल पंपावर मोटारमध्ये फेरफार करून १८ लाख रुपये आणि तेलाची बनावट तूट दाखवून पंप सुरु झाल्यापासून आतापर्यंत ९६ लाख रुपये असा १ कोटी १४ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे.

सहाय्यक निबंधक विभागाने तात्काळ बाजार समितीवर प्रशासक नेमून चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत , अन्यथा बाजार समिती आणि जिल्हाधिकारी कार्यलयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा बाजार समिती विरोधी संचालक दादासाहेब हुबाले यांनी दिला . आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितिच्या दिघंची पेट्रोल पंपावर मीटरमध्ये फेरफार करून अठरा लाखांवर अफरातफर केल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले आहे. तशी सचिवांनी कबुली दिली आहे. मात्र दोषींवर कारवाई केलेली नाही . मीटरमधील फेरफारच्या गैरव्यवहारानंतर तेलाच्या प्रत्येक टँकरमध्ये तुटीच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा आरोप हुबाले यांनी केला.

ते म्हणाले , मीटरमध्ये फेरफार करून १८ लाखांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. याशिवाय तेलाच्या प्रत्येक टँकरमध्ये अंदाजे २०० ते २५० लिटर तेलाची तूट दाखवून वीस ते पंचवीस हजारांचा गैरव्यवहार केला आहे. प्रत्येक महिन्याला पंपावरून आठ ते नऊ टँकरच्या तेलाची विक्री होते.

पंप सुरु झाल्यापासून चार वर्षात ९६ लाखांवर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होते. मीटरमध्ये फेरफार करून १८ लाख आणि तेलाची तूट दाखवून ९६ लाख असे एक कोटी १४ लाखांचा भ्रष्टाचार दीघंची पेट्रोल पंपावर केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत , तसेच बाजार समितीचे लेखापरीक्षण करावे अशी मागणी हुबाले यांनी केली आहे.