उद्या, शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. भारतातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या रे नगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते येणार आहेत. त्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रे नगर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तर उद्या मोदींच्या दौऱ्यासाठी रंगीत तालीम सुद्धा प्रशासनाकडून केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रे नगर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर झळकू लागले आहेत. तर रस्त्याच्या कडेने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे झेंडे लागल्याचे दिसून येत आहे.