थेट पाईपलाईनला मोठी गळती….

काळम्मावाडी-कोल्हापूर थेट पाईपलाईन कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. वारंवार पाईपलाईनची गळती सुरूच आहे. कोल्हापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईनला मांगोली (ता. राधानगरी) मुख्य रस्त्यानजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली. सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी किमान १० फूट उंच उडत असल्याचे दिसले.

आज सकाळी मांगोली येथे उच्च दाबामुळे पाईपलाईनला बसविलेला चक्क व्हॉल्व उडून पाण्याची मोठी गळती सुरु झाली. पाण्याचा दाब इतका मोठा होता की, जवळपास दहा फुट पाणी वरती उडत होते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकाचे व बांधाचे प्रचंड नुकसान झाले.

पाण्याच्या प्रवाहाने शेजारील शेतांना तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते. गळती लागली की संपर्क करायचा तर कोणाशी यासाठी पाईपलाईन मार्गावरती ठराविक अंतरावर पाईपलाईन संदर्भात एखादी घटना घडल्यास संपर्कासाठी संपर्क पाट्या लावणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक लोकांचे आहे.