रोहित पवारांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बॅनर

विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्यांची चौकशी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट मोठं शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘पळणार नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले आहेत.ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे, तसेच मुंबई पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालय तसेच राष्ट्रवादीचे कार्यालय दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.