हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील शाळेत वर्ग सजावटीत महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतान चा फोटो लावल्याने गावात तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनास धारेवर धरत फोटो लावणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करून त्याला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली.
मिळालेली माहिती अशी मौजे वडगाव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये शाळेअंतर्गत वर्ग सजावट सुरू आहे. शाळेतील शिक्षकांच्या आदेशावरून वर्ग सजावटीसाठी वर्गातील विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा केली होती. या वर्गणीतून महापुरुषांचे फोटो व अन्य सजावटीचे साहित्य खरेदी केले होते.
सजावट करताना महापुरुषांच्या फोटोशेजारी एका विद्यार्थ्यांने टिपू सुलतानचा फोटो लावला होता हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षकांना सांगितल्यावर टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला.
गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेऊन विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाका असा आग्रह धरला. या मागणीसाठी शाळेतच त्यांनी ठिय्या मारला त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले.