सरकारने अनेक योजना गोरगरीब जनतेसाठी राबवत असते. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी प्रतिकुटुंब एक साडी मोफत वितरित करण्याबाबतच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी प्रतिकुटुंब एक साडी मोफत वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेकरिता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करून रास्त भाव दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुका स्तरावरील गोदामापर्यंत पोहोचविणार आहेत. तेथून अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांपर्यंत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची राहणार आहे.
तालुका स्तरावरील गोदामांपर्यंत ज्याप्रमाणात साड्यांचा पुरवठा करण्यात येईल, त्याप्रमाणात तत्काळ साड्यांचे वाटप करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
या योजनेंतर्गत साड्यांचे वितरण प्रजासत्ताक दिनपासून होळी सणाच्या दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक गावातील रास्त भाव दुकानांपर्यंत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळविण्यात आले आहे.
एक विशेष प्रकारचे रेशनकार्ड सरकारने अत्यंत गरीब वर्गात समाविष्ट असलेल्या कुटुंबांना दिले आहे. ज्या कुटुंबांना कोणतेही नियमित उत्पन्न नाही अशा कुटुंबांना करण्यासाठी हे कार्ड जारी केले. मजूर, वृद्ध आणि बेरोजगार या वर्गात येतात. या शिधापत्रिकाधारकांना सध्या महिना ३५ किलो गहू व तांदूळ मोफत दिले जात आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.