बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराने एका प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली आहे. मला प्रचंड संताप आला असून हे सगळं सहन करण्यापलिकडे आहे. आता प्रशासनाने कारवाई करावी असे विनंती मलायका अरोराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ठाण्यातील पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये श्वानांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मलायकाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मलायकाशिवाय, रितेश देशमुख, जुई गडकरी यांनीही संताप व्यक्त केला.
ठाण्यातील आर मॉलजवळ असणाऱ्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ग्रुमिंगसाठी आणण्यात आलेल्या एका श्वानाला क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना 7 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. अभिनेत्री मलायकाने श्वानाला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे तिने म्हटले. या केंद्रावरही कारवाई झाली पाहिजे असेही तिने म्हटले.