द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतला आहे. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण, या निर्णयामुळं बेदाण्याला दराची झळाळी येणार आहे.
तसेच पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोषण आहार आता अधिक पोषक होणार आहे.दरम्यान, शासणाच्या या निर्णयाचं सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून स्वागत केलं.
सांगली जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकर्यांचा मालाला चांगला दर मिळावा, तसेच मुलांना अधिक पौष्टिक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्यानं धरला होता.
अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात येत होती.
त्यासाठी मोर्चे, आंदोलने देखील करण्यात आली होती. अखेर शेतकऱ्यांचा शेतीमाल असणाऱ्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोष साजरा केला.