वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.सततच्या होणाऱ्या गळतीमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी-सुळकूड पाणी योजनेसाठी आता महिलांनी कंबर कसली असून, आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सोमवार (दि. १९) पासून महात्मा गांधी पुतळा चौकात आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपच्यावतीने उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देण्यात आले.
सुळकूड पाणी योजनेचा प्रश्न आता महिलांनी आपल्या हाती घेतला आहे. या पाण्यासाठी आमरण उपोषणास काही महिला बसणार आहेत. मंजूर सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी या महिलांची मागणी आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात, शहरासाठी १६१ कोटींची सुळकूड पाणी योजना सन २०२० साली मंजूर झाली आहे. इचलकरंजी शहरास पाणी दिल्यास कोणाचेही नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्याला धक्का बसणार नाही. तरी मंजूर पाणी योजनेची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सुषमा साळुंखे, ज्योत्स्ना भिसे, शोभा इंगळे, स्वाती गणपती, संपदा कांबळे, शबाना कमाल, आदींचा समावेश होता.