मुलांचे पुढील भविष्य आणि करिअरची वाट बोर्डाच्या परीक्षांवर अवलंबून असते. 12 वी बोर्डाच्या परीक्षांना सुरवात (Exam Tips) झाली असून आता येत्या 1 मार्चपासून 10 वीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. 10 वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.
बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थी जिवतोडून मेहनत घेतात, पण काही वेळा छोट्या चुकांमुळे विद्यार्थी निकालामध्ये प्रभाव पाडू शकत नाहीत. म्हणूनच अभ्यासाबरोबरच पेपर सोडवताना कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग पाहूया सोप्या वाटणाऱ्या पण तितक्याच महत्वाच्या काही अभ्यासाच्या टिप्स….
1. मार्गदर्शक तत्त्वे वाचण्यास विसरू नका: प्रश्नपत्रिका हातात मिळताच सर्वप्रथम त्यावरील सर्व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा. कोणत्या विभागातून किती प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तसेच कोणत्या दोन प्रश्नांमधून तुम्हाला सोपा वाटणार प्रश्न निवडण्याची संधी दिली जाते हे आधी समजून घ्या.
अनेकवेळा मुले दोन्ही प्रश्नांची उत्तरे घाईघाईने लिहितात, त्यामुळे वेळ वाया जातो आणि ते अतिरिक्त प्रश्न सोडवण्यासाठी गुण मिळत नाहीत, त्यामुळे घाईघाईने पेपर लिहू नका. प्रश्न निवडण्याकडे विशेष लक्ष द्या.
2. वेळेचं नियोजन महत्वाचं : प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि या दरम्यान वेळ पुरेल याची पूर्ण काळजी घ्या. अनेक विद्यार्थी दोन-तीन प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात एवढा वेळ घालवतात की त्यांना उरलेले प्रश्न सोडवायला वेळ मिळत नाही, त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.
3. अतिशयोक्तीने उत्तरे लिहू नका
लिखानाचा वेळ वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे; तुम्ही जेवढे विचारले आहे तेवढेच उत्तर लिहा. जसा प्रश्न आहे त्याप्रमाणे अचूक उत्तर लिहा, कारण केवळ अतिशयोक्तीने उत्तर लिहून चांगले गुण मिळू शकत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्याने परीक्षकही प्रभावित होतात आणि तुम्हाला चांगले गुणही देतात.