धनंजय महाडिकांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी….

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची दाट शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे.

या निरीक्षक निवड यादीत कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची उत्तर मध्य-मुंबई या ठिकाणी निरीक्षक म्हणून निवड केली आहे.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील २३ मतदार संघातील निरीक्षक निवड यादीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा या निवडणूक निरीक्षक यादीत समावेश नाही. निवड यादीनंतर या दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे चित्र आता गडद झाले आहे.

भाजपकडून दोन पैकी एका मतदारसंघावर दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र या निवड यादीमुळे काही अंशी विद्यमान खासदारांना दिलासा मिळाला आहे. भाजप निवडणूक निरीक्षकांची संपूर्ण यादी जाहीर केली असून, यामध्ये कोल्हापूर वगळून अन्य मतदार संघाचा समावेश आहे. उत्तर मध्य मुंबईची जबाबदारी धनंजय महाडिक, राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.