पक्ष, चिन्ह कोणतेही असले, तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीकडून लढावे अशी ऑफर असली तरी शेट्टी मात्र ‘एकला चलो रे..’ या भूमिकेवर ठाम आहेत. तीच भूमिका घेऊन मतदारांसमोर जाण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात त्यांना ‘बाय’ देण्याच्या मनस्थितीत आहे. खासदार माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून त्यांच्याऐवजी ही उमेदवारी राहुल आवाडे यांना मिळावी, असा प्रयत्न आवाडे गटाकडून सुरू असला, तरी तसे काही घडण्याची शक्यता धूसर वाटते.
या मतदारसंघातून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून खासदार माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे. हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत.
त्यामुळे खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा पर्याय येऊ शकतो. स्वत: माने यांनाही त्यातच जास्त रस आहे; परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावरच चिन्ह बदलाचा निर्णय होईल.