भाजपच्या दोन खासदारांचा राजकारणालाच रामराम!

गामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पहिल्या उमेदवार यादीची प्रतीक्षा असतानाच अवघ्या 24 तासांमध्ये दोन खासदारांनी राजकारणाला तडकाफडकी रामराम केल्याने खळबळ उडाली आहे. गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा या दोन भाजप खासदारांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. गंभीरने पुन्हा क्रिकेटशी निगडीत बाबीवर लक्ष केद्रित करण्यासठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे .जयंत सिन्हा यांनी राजकारणातून बाजूला होत भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन, असे म्हटले आहे. 

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन बैठकीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सुमारे 16 राज्यांच्या नावांवर चर्चा केली. पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये तिकिट कापल्यानंतरही नाराजी उफाळण्याची चिन्हे आहेत. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी केली आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन.

याआधी खासदार गौतम गंभीरने असेच ट्विट करून जेपी नड्डा यांना निवडणूक ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीनंतर काही तासांनी जयंत सिन्हा यांनीही ट्विट करून अशीच मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आर्थिक आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहीन, असे ते म्हणाले. गेली दहा वर्षे भारतातील आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. त्यांनी लिहिले की, ‘याशिवाय, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या अनेक संधींचा आशीर्वाद मिळाला आहे. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद.’