उद्यापासून येडेनिपाणीत होणार शिवलीलामृत पारायण!

उद्या शुक्रवार ८ मार्चला महाशिवरात्री आहे. अनेक भाविक भक्त उपवास करून महादेवाच्या दर्शनासाठी महादेव मंदिरात जात असतात. येडेनिपाणी तालुका वाळवा येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या वतीने उद्या शुक्रवार ८ मार्चपासून महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून याचा लाभ परिसरातील सर्व शिवभक्तांनी घ्यावा, असे आव्हान मल्लिकार्जुन सेवा मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी केले आहे. श्री मल्लिकार्जुन डेकोरेशनकडून मंदिर परिसराला लाइटिंग करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी सात वाजता माणिक थोरात, तुकाराम पाटील, बंडा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीलामृत ग्रंथ वाचन पारायण, शनिवार ९ मार्च रोजी सकाळी द्वादशीचा प्रसाद व रविवार १० मार्च रोजी क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाचा ५० वा महाप्रसाद, तसेच सालाबादप्रमाणे अमृतधारा गीत मंच हुपरी यांच्याकडून संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पालखी सोहळा होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.