इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना यंदा वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, अन्यथा त्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही. १४ वर्षांनी ‘आरटीई’ नियमात पुन्हा बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे.
या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.’आरटीई’ धोरणानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याची पद्धत २०१० पासून सुरू झाली होती. त्यावेळी या ढकलपास पद्धतीला अनेकांनी विरोध केला, तरीपण ही पद्धत राज्यभर लागू झाली. सरसकट पास करण्याच्या पद्धतीमुळे इयत्ता दहावीतून शाळा सोडणाऱ्यांची आणि बारावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली.
पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय व्यवस्थित समजायला हवे आणि त्याचे पारदर्शक मूल्यमापन होणे जरूरी आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण फार कठीण जाणार नाही असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार असून त्यात त्या विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागणार आहे.
‘आयटीआय’चे अनेक कोर्स इयत्ता आठवीवरूनच असून त्याठिकाणी हुशार मुलांना संधी मिळणार आहे. शाळा स्तरावर जिल्हा परिषदेसह खासगी माध्यमिक, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायिता, अंशत: अनुदानित अशा सर्वच आस्थापनाच्या शाळांमधील पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे.
या परीक्षेत नापास झालेल्यांना पुन्हा एकदा एका महिन्याने संधी दिली जाणार असून ही परीक्षा मे महिन्यात पार पडेल. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्यांना जूनपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल, अन्यथा नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागणार आहे.