सांगली लोकसभा मतदार संघावर शनिवारी होणार निर्णय

सांगली मतदारसंघ कॉंग्रेस की शिवसेनेला द्यावा, याबाबतचा निर्णय शनिवार, दि. ९ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मुंबईतील बैठकीत होणार आहे. या बैठकीत निर्णय झाला नाही तर पुन्हा दि. ११ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील सांगली लोकसभा काँग्रेसकडे ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडे करणार आहेत.

सांगली लोकसभा मतदार संघावर शिवसेनेनेही दावा केला आहे. पण, या मतदार संघाबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. याबरोबरच राज्यातील अन्य काही लोकसभा मतदार संघांतही महाविकास आघाडीत इच्छुक जास्त आहेत. म्हणून उमेदवार निश्चित करण्यासाठी शनिवार, दि. ९ मार्च रोजी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जवळपास लोकसभेचे उमेदवार निश्चित होणार आहेत.