हुपरीत तरुणांच्या दोन गटांत हाणामारी!

रंगपंचमी खेळत असताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून शनिवारी हुपरी येथील कागलवेस परिसरातील तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादावादीचे पर्यवसान दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी हाणामारीत झाले. यामध्ये तीन ते चार युवक जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत शहरात तणावपूर्ण वातावरण होते.

या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यासाठी दोन्ही गटांतील तरुण रात्री उशिरापर्यंत हुपरी पोलिस ठाण्यासमोर मोठ्याप्रमाणात गर्दी करून होते. याबाबत समजलेली माहिती अशी शनिवारी रंगपंचमी खेळत असताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून येथील कागलवेस व म्हेतर गल्लीतील तरुणांच्या मध्ये मोठ्याप्रमाणात वाद झाला होता.

काही ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला होता, पण तरीही आज सायंकाळी पुन्हा त्यांच्यात मोठ्याप्रमाणात उफाळून आल्याने दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीवेळी दगड, काठीसह अन्य हत्यारांचा वापर झाल्याने यामध्ये तीन तरुण जखमी झाले. दरम्यानच्या कालावधीत हुपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी संतप्त तरुणांवर पोलिसी खाक्या दाखवत धरपकड सुरू करून नियंत्रण मिळविले.