आनंदाचा शिधा वाटपाला आचार संहितेचा ब्रेक!

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकांना गोडधोड देण्याची योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते. परंतु आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्याने आगामी दोन महिने आनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या योजनेला आचारसंहितेचा ब्रेक लागल्याने १५ लाख ३९ हजार ९३५ लाभार्थींना तीन महिन्यांची (जुलैपर्यंत) प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात तीन लाख ४५ हजार पाच रेशनकार्डधारक आहेत.राज्यातील दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना सण-उत्सव काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य नाममात्र दरात वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील १५ लाख ३९ हजार ९३५ लाभार्थींना आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळत आहे. सण, उत्सव काळात आनंदाचा शिधा रेशन कार्डवर दिला जातो.

हा शिधा दिवाळी, मध्यतंरी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या काळात वितरित करण्यात आला होता.जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल असे किट १०० रुपयांत गुढीपाडव्याला, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तीन महिने आनंदाचा शिधा वाटप बंद राहणार आहे. आनंदाचा शिधा मिमळण्यासाठी कार्डधारकांना जुलै महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.