यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील

इचलकरंजी, यंत्रमागधारकांनी मांडलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत त्या प्राधान्याने दूर केल्या जातील. तसेच यंत्रमागधारक व महावितरण यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महावितरण कंपनी इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी दिले. त्याचबरोबर यंत्रमागधारकांनीही महावितरणला पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महावितरणच्या इचलकरंजी विभागाचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी येथील दि इचलकरंजी पॉवरलुम (power loom) असोसिएशनला सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एस. हाथोळकर व प्रसाद अवघडे, उपकार्यकारी अभियंता एस. बी. चौगुले, उपव्यवस्थापक एस. बी. गोसावी हे उपस्थित होते. पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोंदिले यांचे स्वागत केले. श्री. पाटील यांनी, पॉवरलुम असोसिएशनच्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती देऊन महावितरण व पॉवरलुम असोसिएशन यांच्यातील यापूर्वीचे संबंध व सहकार्य अशाच प्रकारे आपल्याकडून पुढे चालू राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली.

 तसेच शहापूर, तारदाळ, खोतवाडी, आमराई मळा येथील सबस्टेशन अद्याप सुरू झालेले नाही, नविन सबस्टेशन जागेची उपलब्धता, आवाडे सबस्टेशन महापूरात पाण्याखाली जाते, त्यामुळे त्याची ऊंची वाढविणे, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, मागेल त्याला त्वरीत वीज कनेक्शन मिळावे अशी मागणी केली. यावेळी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, प्राईड इंडिया पार्कचे चेअरमन सुरेश आमासे यांच्यासह प्रतिष्ठीत कारखानदार उपस्थित होते.