खानापूर (Khanapur) तालुक्यातील दोन भाऊंच्या गटांत फिरत असलेल्या राजकारणात यावेळी प्रथमच टि्वस्ट येण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिवंगत अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या बदललेल्या राजकीय भूमिका, काँग्रेस-राष्ट्रवादीतील फूट, भाजपमध्ये नव्याने झालेली मेगाभरती, तालुक्याचे भूमिपुत्र चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना शिवसेनेकडून जाहीर झालेली उमेदवारी आणि काँग्रेसकडेच, म्हणजे विशाल पाटीलच महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत, यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी लावलेली ताकद, यामुळे नेमकी लढत कशी होणार, याबाबत संभ्रम आहे.
मात्र या वेळी तालुक्याच्या राजकारणात नवी समीकरणे पुढे येतील, अशी चिन्हे आहेत. राज्यात उद्धव ठाकरे यांना पायउतार करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद पटकावले. या सर्व घडामोडींत खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) अग्रभागी होते. मात्र आता आमदार बाबर यांचे निधन झाले.
त्यांचे चिरंजीव सुहास यांच्याकडे त्यांची राजकीय धुरा येणार, हे जवळपास निश्चित आहे. ते महायुतीसमवेत राहणार, हे सध्याचे चित्र आहे.महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदाशिवरावांची ही भूमिका पुढची राजकीय लढत गृहित धरून होती. तथापि, सत्तांतरानंतर सारेच संदर्भ बदलले. दरम्यान, राष्ट्रवादीतच फूट झाल्यानंतर ही गणिते आणखी विस्कळित झाली. या नव्या फेरमांडणीत सदाशिवराव यांचे राजकीय वारस माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सदाशिवरावांनी मात्र नेमकी जाहीर भूमिका टाळली. मात्र त्यांनी मौन पाळत वैभव पाटील यांना मोकळे रान करून दिल्याचे मानले जात आहे.भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच संजय पाटील यांनी खानापूर तालुक्यात प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे.
त्यांचे चिरंजीव प्रभाकर यांनी विट्यासह तालुक्यात पहिली संपर्क फेरी पूर्ण केली आहे. तालुक्यातील दोन्ही प्रबळ राजकीय गट बाबर-पाटील सध्या महायुतीसमवेतच असल्याने सध्या खासदार पाटील यांचे पारडे कागदावर स्पष्टपणे जड वाटत आहे.
तथापि राजकारणात दोन अधिक दोन चार नसते. कारण आता चंद्रहार पाटील यांच्या रुपाने तालुक्याच्या भूमिपुत्राला जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याची संधी मिळाली आहे.चंद्रहार यांचा जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून तालुक्यात चांगला संपर्क आहे. गत दोन वर्षांत त्यांनी खूपच तयारी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रचाराला गती दिली आहे. तथापि, त्यांच्या उमेदवारीला अद्याप महाविकास आघाडीचा हिरवा झेंडा मिळालेला नाही. त्यांची उमेदवारी कायम राहिली तर निश्चितपणे तालुक्यात चांगला जनाधार मिळणार आहे. अर्थात, ही लढत तिरंगी झाली तर इथली समीकरणे १८० कोनात बदललेली असतील.
