काल रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले होते. इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील मंदिरात आकर्षक फुलांनी मूर्तीची सजावट केली होती. जन्मकाळानिमित्त महिलांनी पारंपारिक पध्दतीने उत्सव साजरा केला. आयोध्या येथे राम मंदिराची उभारणी केल्यानंतर प्रथमच इचलकरंजी आणि परिसरात श्रीरामनवमी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दुपारी जन्मकाळाच्या वेळी मंदिरांमध्ये भजन, कीर्तनास भाविकांनी गर्दी केली होती. आयोध्या येथे राम मंदिर उभारुन त्याठिकाणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर प्रथमच होत असलेल्या श्रीराम नवमी सोहळ्याचे औचित्य साधत
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी दिसत होती. येथील रामजानकी मंदिर, झेंडा चौक, भोनेमाळ, सातपुते गल्ली, गायत्री भवन यासह शहर परिसरातील श्रीराम मंदिर आणि विविध मंदिर आणि घरगुती ठिकाणी श्रीरामनवमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये व्याख्यान, भजन, कीर्तन, विविध स्पर्धांचा समावेश होता. तसेच मंदिर आणि परिसरांचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती. काही ठिकाणी सप्ताहही साजरा करण्यात आला. गावभागातील गजानन महाराज मंदिरात पू. बाळ महाराज, मदन कारंडे, किरण दंडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची आरती झाली. त्याचबरोबर गावभागातील रामजानकी मंदिर येथे असंख्य भाविकांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. सकाळपासून कीर्तन, प्रवचन आणि जन्मोत्सवाचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. सुंटवडयाचा प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जन्मोत्सवाच्यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. शहरात भगवे ध्वज घेऊन काही कार्यकर्त्यांनी श्रीरामाचा जयघोष करत वाहन फेरीही काढली. येथील सातपुते गल्लीत पाच दशकांपासून अखंडीतपणे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बुधवारी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मकाळाचे कीर्तन झाले. त्यानंतर सायंकाळी प्रभू श्रीरामाची नगर दिंडी मिरवणूक काढण्यात आली. तर आज (गुरुवारी) १८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते २ काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
