हातकणंगलेत नेज पाणी योजनेचे पाणी शेततळ्यात विक्रीचा प्रकार उघडकीस……

सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक तालुक्यात पिण्याचे पाणी देखील मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अशातच हातकणंगले शहरात एक प्रकार उघडकीस आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हातकणंगले-नेज ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि काही सदस्यांनी परस्पर खासगी व्यक्तीला पाणी विक्री केल्याचा प्रकार नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवकांनी उघड केल्याने खळबळ उडाली आहे.

नगरपंचायतने याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.नगरपंचायत आणि नेज ग्रामपंचायतीसाठी वारणा नदीवरून हातकणंगले व नेज ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना १९९८ पासून सुरू आहे. नेज ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या पाणी योजनेचे पाणी शुद्धिकरण केंद्र असल्याने नेज ग्रामपंचायतीचा पाणी वाटपामध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी केला आहे. हातकणंगले शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरामध्ये चार दिवसआड पाणी येते.

पाणी शुद्धिकरण केंद्रातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता, यासाठी माजी उपनगराध्यक्ष केतन कांबळे, नगरसेवक रमजान मुजावर, उमेश सूर्यवंशी, राहुल हातकणंगलेकर आणि कर्मचारी शुद्धिकरण केंद्रावर गेले असता त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याने खासगी शेततळ्याला पाणीपुरवठा सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत जाब विचारला असता सदस्य आणि ग्रामसेविका यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.