योगी आदित्यनाथ, शरद पवार, उद्धव ठाकरे उद्या इचलकरंजीत…..

हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ एक मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इचलकरंजी शहरात येत आहेत. महाविकास आघाडीची सभा सायंकाळी 5 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक येथे तर योगी आदित्यनाथ यांची सभा सायंकाळी 5 वाजता थोरात चौक येथे होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. सतेज पाटील आदींच्या उपस्थितीत सभा होणार आहे.

या सभेसाठी 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर सहानुभूतीची लाट मतदारसंघात आहे. माजी खा. राजू शेट्टी आणि विद्यमान खा. धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या पाणी आणि वस्त्रोद्योगासह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात संतापाची लाट असल्याचेही बावचकर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, राहुल खंजिरे, महादेव गौड, उदयसिंग पाटील, विनय महाजन, वैभव उगळे, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी महायुतीसह घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बैठकीस जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, अशोकराव माने, रवी गोंदकर, अनिल डाळ्या, भाऊसो आवळे आदी उपस्थित होते.