बागलवाडी (ता. सांगोला) गावात मतदानाला गालबोट लागले. दादासाहेब मनोहर चळेकर या मतदाराने मंगळवारी दुपारी १२:४८ च्या सुमारास बागलवाडी जि.प. प्रा. शाळा बूथ क्रं.८६ वर येऊन मतदान केले. त्यानंतर अचानक त्याने खिशात आणलेल्या बाटलीतील काही तरी द्रव्य टेबलावर ठेवलेल्या तिन्ही ईव्हीएम मशीनवर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला.
कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कॅनमधील उपलब्ध पाणी ईव्हीएमवर टाकून आग विझवली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर मतदान प्रक्रिया सुमारे १ तास खोळंबली होती. त्यानंतर मात्र मतदान सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.
बागलवाडी येथील प्रकारानंतर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदार प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यापूर्वी झालेले मतदान सुरक्षित आहे. ईव्हीएम मशीनमधील डाटा व्यवस्थित आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सुरळीत मतदान झाले.