विट्यात विशाल समर्थकांनी उधळला गुलाल….

अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाल्याचे घोषित होताच विट्यातील त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील अशी लढत झाली.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेकडून मशाल हाती घेत सांगली लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकला होता. अपक्ष उमेदवार विशाल पाटील देखील निवडणुकीत उतरले.अखेरच्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाल्याचे जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.

नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते कराड रोड ते ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत तसेच मायणी रोड मार्गावरून विजयी रॅली काढून घोषणाबाजी, गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.