साळशिंगे रस्त्यालगत मुले आणि मुलींसाठी दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे आहेत. यातील मुलांच्या वसतिगृहात एकूण 94 मुले आहेत. यातील पाचवी ते दहावीच्या वर्गातील 11 ते 18 वयोगटांतील मुलांना रविवारी रात्रीपासून पोटात दुखणे, जुलाब, उलट्या होणे आणि चक्कर येणे असे प्रकार सुरू झाल्याने सोमवारी सकाळी विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी मटणाचे जेवण दिले होते.
त्यानंतर दुपारच्या सत्रात या विद्यार्थ्यांना कलिंगड आणि दूध देण्यात आले आणि नंतर रात्री आमटी आणि चपाती असा आहार देण्यात आला. रविवारी सायंकाळपासूनच काही जणांना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. तसेच काहींना थंडी वाजून ताप भरणे अशी लक्षणे दिसू लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तेथील मुख्याध्यापक देवानंद दौसे यांनी आणि शिक्षकांनी एकूण 24 विद्यार्थ्यांना सोमवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सोमवारी आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल आणि गटविकास अधिकारी संताजी पाटील यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
विट्यातील शासकीय निवासी वसतिगृहातील विषबाधेने बाधित विद्यार्थ्यांची संख्या मंगळवारी 29 वर पोहोचली आहे. तर विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दाखल 24 पैकी दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी सांगलीला पाठविण्यात आले आहे.एका विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी सरकारी ग्रामीण रुग्णालयातून काढून खासगी रुग्णालयात नेले आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याच्या समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या पथकाने ग्रामीण रुग्णालयात येऊन दाखल विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच विटा पोलिस ठाण्याच्या पथकानेही रुग्ण विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली.
मंगळवारी आयुष नामदेव सावंत (वय 13) या विद्यार्थ्यास त्याच्या पालकांनी ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल केले. तर निर्मल किशोर सावंत आणि तेजस सचिन काटे या दोन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे पाहून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवले. मंगळवारी सकाळी अमर अनिल लोंढे (15), कौशल तानाजी गायकवाड (16), सागर किशोर साठे (11), मयूर मारुती मस्के (16) आणि मयुरेश राजेंद्र साठे (15) या आणखी पाच विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची संख्या 26 वर पोहोचली.
सांगली जिल्हा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तनितीन उबाळे यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी उपस्थित असलेल्या रुग्ण विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापक देवानंद देवसे यांच्या मनमानी कारभाराबद्दल अनेक तक्रारी केल्या. रविवारी दुपारपासून विद्यार्थ्यांना त्रास होत होता. सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
परंतु या गोष्टींची कल्पना सोमवारी रात्रीपर्यंत मुख्याध्यापकांनी आम्हाला दिली नाही, असा गंभीर आरोप संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी उबाळे यांच्यासमोर केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विट्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, नाईक सत्यवान मोहिते आणि शैलेश माळी यांचे स्वतंत्र पथक पाठवून विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली.