खानापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १७ मध्ये पोटनिवडणूक घेण्याची प्रशासनाने तयार सुरू केली आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग १७ मधून उमा रामचंद्र देसाई या निवडून आल्या होत्या. त्यांच्या पतीच्या इमारतीच्या बांधकामावर अनधिकृत असल्याचा आक्षेप घेत नगर पंचायतीतील सत्ताधारी गटाने याचिका दाखल केली होती. त्यामुळे उमा देसाई यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्याने ही जागा रिक्त झाली होती.
या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३ जुलैला प्रभाग १७ ची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीवर ८ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
उमा देसाई यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्याने पद रिक्त होते त्यानंतर निवडणूक लागली आहे. ११ जुलैला अंतिम मतदार यादी व १२ जुलैला मतदार केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लवकरच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीच्या सोनाली यादव यांनी सांगितले.