नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला जोरदार झटका देत महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महाविकास आघाडीच्या गटात असणारा उत्साह येणाऱ्या विधानसभेपर्यंत कायम रहावा, या उद्देशाने राष्ट्रवादीकडून शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून स्व. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या 8 जुलैला कवठेमहांकाळ येथे मोठा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप महायुतीला घाम फोडला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पवारांनी आता आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनाच यावेळी विधानसभेला संधी देण्यात येईल, असं बोललं जात आहे.
त्याच अनुषंगाने रोहित पाटलांच्या वाढदिवसाच्या ’टायमिंग’ साधत शरद पवारांनी इथे 8 जुलैला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी संपूर्ण दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम दिला आहे. याच मेळाव्यातून विधानसभा प्रचाराचा शुभारंभ शरद पवार करणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीतील बिरोबा देवस्थानचे दर्शन घेऊन शरद पवार हजारो मोटरसायकलच्या रॅलीने कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याच्या मैदानावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास्थळी दाखल होणार आहेत. या मोटरसायकल रॅलीचीही जय्यत तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे.
