इचलकरंजीत कापड गोदामास आग…..

इचलकरंजीतील चंगेडिया मिल्सच्या कापड गोदामास आग लागून कापड गाठी, वायरिंग जळुन खाक झालं. आज पहाटे लागलेली ही आज दुपारपर्यंत धुमसत होती. महापालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली.या घटनेत सुमारे सव्वा कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.इचलकरंजीतील दिलीप चंगेडिया आणि श्रीकांत चंगेडिया यांचा उपरणं, धोती यासह पुजेसाठी लागणारे सोहळे उत्पादनाचा व्यवसाय आहे. या फर्मच्या माध्यमातून चंगेडिया आपली उत्पादनं भारतभर पाठवत असतात. या गोदामातून आज पहाटे धुर बाहेर पडत असल्याचं शेजारच्यांना निदर्शनास आलं. त्यांनी याबाबत चंगेडिया यांना माहिती दिली. त्यांनी त्वरीत धाव घेऊन पाहणी केली असता आग लागल्याचं निदर्शनास आल्यानं महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं. 6 बंबांनी पाण्याचा मारा करून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते.

यावेळी धुरामुळं मदतकार्यात अडथळा येत असल्यानं खिडक्या फोडून धुराला वाट करून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा आज दुपारी 12 वाजता कापडाच्या गाठीतून धुर येऊ लागल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करून पाण्याचा मारा करण्यात आला. या घटनेत कापड गाठी, वायरिंग आणि इमारतीचं सुमारे सव्वा कोटीचं नुकसान झालं आहे. शॉर्ट सर्किटंनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.