पुरात पोहताना चंदूर येथून युवक बेपत्ता! शोधमोहीम सुरू

पुराच्या पाण्यात पोहण्याचा धाडसी उपक्रम राबविणाऱ्‍या ग्रुपमधील एक युवक चंदूर येथून बेपत्ता झाला. अविनाश लक्षण आपुगडे (वय ४२, रा. गणेशनगर) असे त्याचे नाव आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिवसभर भरपावसात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. याबाबत पोलिसांत कोणतीच नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचांगा नदीच्या पाणीपातळीत जेव्हा वाढ होते, त्यावेळी पट्टीच्या पोहणाऱ्या टीममधील सदस्य मोठ्या संख्येने रूई बंधारा ते इचलकरंजी पंचगंगा नदीघाट असे ११ किमी अंतर पोहत जाण्याचा उपक्रम राबवतात.

रूई बंधाऱ्यापासून पोहत जातात आणि पंचगंगा वरदविनायकाचे दर्शन घेऊन संकल्प पूर्ण करतात. यंदा यामध्ये तब्बल ४२ जण सहभागी झाले होते. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी नदीच्या पुलावरून नदीच्या वाहत्या पाण्यात उडी मारली. सर्वांच्या सोबत पोहत गतीने ते अंतर कापत होते. हातकणंगले तालुक्यातील चंदूर दरम्यान आल्यानंतर या टीममधील तिघेजण मागे राहिले. त्यामध्ये अविनाश आपुगडे याचा समावेश होता. नंतर त्यातील दोघेजण पोहत सर्वांच्या सोबत आले, मात्र अविनाश मागेच राहिला.

मोहीम फत्ते करत पंचगंगा नदी घाटापर्यंत पोहत आलेल्या त्या ४१ जणांना अविनाश मागे राहिल्याचे समजताच धक्काच बसला. काही वेळ त्यांनी त्याची वाट पाहिली. त्यानंतर याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन पथकाला दिली. आपत्कालीन पथकाचे प्रमुख संजय कांबळे यांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली. इचलकरंजी ते रुई बंधारा असा दिवसभर वरून पडणाऱ्या मुसळधार पावसात तीनवेळा शोधमोहीम राबवली, मात्र त्याचा शोध लागलाच नाही.